गेल्या काही वर्षांपासून शेतीवर सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वारे इत्यादी नैसर्गिक संकटे कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले उत्पादन मातीमोल होते व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक संकटामध्ये अडकल्याचे सध्याचे चित्र आहे.
या सगळ्या परिस्थितीमुळे शेती नफा देणारी तर सोडाच परंतु उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाल्याने हा व्यवसाय परवडण्याजोगा राहिलेला नाही.परंतु अशाही परिस्थितीमध्ये काही शेतकरी पिक लागवडीचे उत्तम नियोजन आणि हवामान बदलानुसार पिक पद्धतीत बदल करून या संकटांवर मात करताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याप्रमाणे बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील तरुण शेतकरी राहुल अशोकराव दिघे यांचे उदाहरण घेतले तर दोन एकर क्षेत्रावर बाराही महिने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन ते लाखात नफा मिळवत आहेत.
भाजीपाला शेतीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील चितोडा या गावचे राहुल अशोकराव दिघे हे कृषी पदवीधर असून शेतीमध्ये कायम नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असतात व राहुल दिघे यांना त्यांचा मोठा भाऊ अरुण यांचा देखील शेतीमध्ये खूप मोठा हातभार लागतो.
त्यांच्याकडे एकुण वीस एकर शेती असून त्यातील दोन एकर क्षेत्रावर ते बाराही महिने टोमॅटो तसेच मेथी, कोथिंबीर, कारले, टोमॅटो, शिमला मिरची, काकडी आणि दोडक्यासारखे भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. या पिकांचे उत्पादन घेताना त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर ते करतात.
या भाजीपाला पिकातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा विचार केला तर या वर्षी त्यांना कारले तसेच टोमॅटो व मिरची, दोडके या भाजीपाला पिकांच्या उत्पादनातून सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
भाजीपाला पिकांचे अशा पद्धतीने करतात व्यवस्थापन
भाजीपाला पिकाच्या लागवडीकरिता ते प्रामुख्याने बेड व बेडवर मल्चिंग पेपरचा वापर करतात. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे त्यांना कमीत कमी पाण्यात भाजीपाला पिकांचे व्यवस्थित नियोजन करता येते. तसेच मल्चिंगच्या वापराने रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते व गवताचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निंदनीवरचा खर्च वाचतो.
तसेच मल्चिंगमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाल्याने ओलावा देखील टिकतो. याशिवाय या पिकांकरिता ते शेडनेटचा वापर करतात व खत व्यवस्थापन करताना योग्य त्या खतांची मात्रा व रोग नियंत्रणाकरिता वेळोवेळी फवारणीचे नियोजन देखील करतात.
याबाबत राहुल दिघे म्हणतात की, कोणत्याही एकच भाजीपाला पिकाची लागवड न करता सोबत तीन ते चार पिके ते घेतात. त्यामुळे एखाद्या पिकाला बाजारात भाव कमी मिळाला तरी इतर पिकांना चांगला भाव मिळाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न हाती मिळते. तसेच भाजीपाल्याला जर चांगला बाजार भाव मिळाला तर खर्च वजा जाता 50 टक्के नफा हा मिळतोच.