Sharad Pawar : शिर्डीत असताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न केला.
दरम्यान आता शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेचा समाचार घेतला आहे .
यावेळी शरद पवार म्हणाले, प्रधानमंत्री पद हे इन्स्टीट्यूशन आहे, त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्यामुळे पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दुर असेल, तर त्याचं चित्र मांडाव यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे.
मी कृषिमंत्री असतानाच्या काळात देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण तर झालाच शिवाय काही योजनांमुळे दीर्घकालीन फायदे झाले. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले – शरद पवार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. त्यांनी कृषिमंत्रीपदाच्या काळात अन्नधान्य, कृषी योजना, पीक कर्ज आणि अन्य बाबींवर आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतानाच मोदी यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान खोटे बोलत आहेत
सध्या साखर, कांदा, टोमॅटोपासून अन्य शेती उत्पादनांना दर नाही.तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलीही माहिती न घेता खोटे बोलत आहेत.माहिती न घेता बोलण्यासाठी जे धाडस लागते ते त्यांच्याकडे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला दिले आहे.
मात्र ते शरद पवारांचे दर्शन घेऊन गेले…
पंतप्रधान शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते, मात्र ते शरद पवारांचे दर्शन घेऊन गेले, असा मिश्कील टोला लगावत पवार म्हणाले, ‘पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी.
गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ
२००४ ते २०१४ मी कृषीमंत्री होतो. तेव्हा सुरुवातीला नाइलाजाने भारत अमेरिकेतून गहू आयात करत होता. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेत पुढील काळात गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात टप्प्याटप्प्याने दुप्पट वाढ करतानाच उत्पादनात वाढ केली.
तांदळाचा हमीभाव २००४ ला ५५० होता, तर २०१४ ला तो १३१० रुपये झाला. गहू ६३० वरून १४००, सोयाबीन ७४० वरून २५००, कापूस १७५० वरून ३७००, ऊस ७३० वरून २१००, हरभरा १४०० वरून ३१००, मका ५०५ वरून १३१० तर तुरीचा १३६० वरून ४३०० रुपयांवर हमीभाव गेला.
केंद्रीय कृषी मंत्रालयानेच ही माहिती दिली…
ही वाढ १३८ ते २१६ टक्क्यांपर्यंत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे, असेही पवार म्हणाले. आमच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा आढावा घेतला तर कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून गेला, हे लक्षात येईल.
आम्ही देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवला !
आम्ही देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवला. पंतप्रधान मोदी यांनी काही मुद्दे मांडले. ते वस्तुस्थितीपासून दूर आहेत. यापूर्वी अनेक कार्यक्रमांत ते माझ्या कृषिक्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक करत होते, आता मात्र टीका करत आहेत, असेही पवार म्हणाले.
६२ हजार कोटींची कर्जमाफी
माझ्या कृषिमंत्री पदाच्या काळात शेतकऱ्यांची ६२हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. अन्नधान्य उत्पादनात भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकाचा देश झाला,तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला. ऊस, कापूस, ज्यूट, दूध, फळे, मासे आणि भाजीपाला यांच्या उत्पादनात देखील भारत पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पीक कर्जाचा व्याजदर १८ टक्के होता, तो ४ टक्क्यांवर आणला.