Wheat Farming : खरीप हंगामात यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने मोठा त्राहिमाम माजवला होता. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चांगलाचं बरसला. यावर्षी परतीच्या पावसाने माघारी फिरण्यास उशीर केला.
परिणामी खरीप हंगामातील पीक काढणी लांबणी तसेच याचा रब्बी हंगामातील पीक पेरणी वर देखील विपरीत परिणाम झाला. जमिनीत लवकर वापसा न आल्याने रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या. दरम्यान शेतकऱ्यांना गहू लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करण्यासाठी वापसा कंडिशन न मिळाल्याने यंदा उशिरा गहू लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे.
गव्हाची वेळेवर पेरणी एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान केली जाते. 15 नोव्हेंबर नंतर उशिरा गहू पेरणी करतात. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान उशिरा गव्हाची पेरणी केली जाते. 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला दिला जातो. दरम्यान गव्हाची पेरणी उशिरा केल्यास उत्पादनात साहजिकच घट होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उशिरा पेरणी केली तरी देखील चांगले उत्पादन देतील अशा गव्हाच्या जातीची निवड करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आज आपण महाराष्ट्रासाठी उशिरा गहू लागवड हेतू शिफारशीत करण्यात आलेल्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
उशिरा पेरणीसाठी शिफारशीत जाती खालीलप्रमाणे :-
फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) :- गव्हाचीं ही एक सुधारित जात असून बागायत वेळेवर व उशिरा पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे. यामुळे उशिरा गहू पेरणी करणारे शेतकरी बांधव या जातीचा विचार करू शकतात. जातीची विशेषता म्हणजे ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. या जातीपासून उत्पादित होणाऱ्या गव्हात प्रथिने १२ टक्यांपेक्षा जास्त असतात. गव्हाचा हा वाण चपातीसाठी उत्तम असल्याचा दावा आहे.
या जातीचा पक्व होण्याचा कालावधी बागायतीत वेळेवर ११५ दिवस आणि बागायतीत उशिरा पेरणीखाली ११० दिवस असा आहे. या जातीची बागायती भागात वेळेवर पेरणी केल्यास ४५ ते ५० क्विं/हेक्टरी इतकं उत्पादन मिळू शकतं तर बागायती भागात उशिरा पेरणी केली की ४२ ते ४५ क्विं/हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एनआयएडब्लू ३४ (निफाड ३४) :- गव्हाचीं ही जात बागायती भागात उशिरा पेरणीसाठी शिफारशीत आहे. या गव्हापासून उत्पादीत होणारा गव्हाचे मध्यम टपोरे दाणे असतात आणि गव्हात प्रथिने १३ टक्यांपेक्षा अधिक असते. फुले समाधान या जातीप्रमाणेच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. याशिवाय चपातीसाठी उत्तम वाण आहे. या जातिचा पक्व होण्याचा कालावधी १०० दिवस एवढा असून यापासून उशिरा पेरणी केल्यास ३५ ते ४० क्विं/हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.