आपल्या आजूबाजूच्या जगात अनेक गोष्टी अनपेक्षित घडतात. एखाद्या दिवशी रस्त्यावरून जात असताना जर अचानक तुमच्या नजरेस काही नोटा पडलेल्या दिसल्या, तर तुमचं मन क्षणभर गोंधळून जातं, उचलावं की नाही? असा विचार बहुतेकांना होत असतो. अशाच एका साध्या पण खोल प्रश्नाला वृंदावनचे आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर लोकांच्या हृदयाला भिडतंय.

रस्त्यावरील पैसे उचलावे की नाही?
या व्हिडिओमध्ये एका भाविकाने अत्यंत साधेपणाने प्रश्न विचारला, “महाराज, जर रस्त्यावर पैसे पडलेले दिसले, तर ते उचलणं पाप आहे की पुण्य?” यावर महाराजांनी फार गहन आणि माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, अशा पैशांचा लोभ करणे म्हणजे आपल्या अंतःकरणातील स्वार्थ जागवणं होय. हे पैसे स्वतःसाठी वापरणं चुकीचं आहे, कारण त्यांचा आपण काही परिश्रम न करता लाभ घेतोय. त्यांनी स्पष्ट केलं की जे आपलं नाही ते वापरणं म्हणजे अधर्मच.
मात्र प्रेमानंद महाराजांचा दृष्टिकोन फक्त नकारात्मकतेपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी हेही सांगितलं की जर तुम्ही हे पैसे एखाद्या गरजू व्यक्तीसाठी, एखाद्या आजारी प्राण्याच्या उपचारासाठी किंवा कुठल्या पवित्र कार्यासाठी वापरले, तर त्याच पैशाचं स्वरूप पूर्णतः बदलून जातं. ते फक्त एक नाणं किंवा नोट राहात नाही, तर ते एक पवित्र कर्म बनतं जे पुण्य प्राप्तीचं माध्यम ठरतं. त्या क्षणी ते पैसे लोभाचं साधन न बनता सेवा, करुणा आणि धर्माचं रूप धारण करतात.
स्वतःच्या गरजेसाठी ते पैसे वापरू नका
महाराजांनी हेही अधोरेखित केलं की जे वस्तुतः आपलं नाही, त्याचा उपयोग स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करणं ही गोष्ट नैतिकतेच्या विरोधात जाते. आपण समाजाचा भाग आहोत, आणि आपल्या प्रत्येक कृतीचा समाजावर प्रभाव पडतो. अशावेळी आपल्याला मिळालेली एखादी अनपेक्षित गोष्ट म्हणजे एक परीक्षा असतेआपण किती जबाबदारीने, किती करुणेने वागतो याची.
प्रेमानंद महाराजांचं हे उत्तर केवळ एक धर्मसंकट सोडवणं नव्हे, तर एक शिकवण आहे जी आजच्या वेगवान, स्वार्थी जगात माणसाला थांबून विचार करायला लावते. रस्त्यावर पडलेले पैसे पाहून लोभ करण्याचा क्षण तात्काळ बदलून जातो, जर आपल्या मनात दुसऱ्याची आठवण जागी होते. आणि असा विचार करणं म्हणजेच खरं अध्यात्म.