अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी तर महापालिकेच्या २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला
असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बुधवारी (दि.१०) राज्यस्तरीय विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत आ.संग्राम जगताप यांनी विशेष बाब म्हणून अहमदनगर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी १६ कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
सदर मागणी मान्य करत याबाबत तत्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले.