अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात शनिवारी (दि.१३) बोल्हेगाव परिसरात ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केल्या नंतर सोमवारी (दि.१५) दुपारी आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.
यामध्ये बालिकाश्रम रस्त्यावरील काही भाग, सिव्हील हडकोपरिसरातील काही भाग व कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील जयश्री कॉलनीचा समावेश आहे. सावेडी उपनगरातील बोल्हेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या भागातील मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर हा परिसर, राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंट पर्यंत.
तसेच गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदी कैलास बी इमारत हे परिसर दि.२६ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.
त्यानंतर आता सोमवारी (दि.१५) दुपारी बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथील आर्यन अपार्टमेंट मधील विंग बी आणि सी इमारत, सिव्हील हडकोपरिसरातील गणेश चौक, श्री.चंद्रकांत बोरुडे घर ते श्रीमती नलिनी चोथवे घर परिसर, तसेच कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील जयश्री कॉलनी मधील कव्हाणे घर ते ज्ञानेश्वरी बंगला हे परिसर दि.१५ मार्च रोजी दुपारी २ ते दि.२८ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.
या झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत. तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे कंट्रोल रुम्स स्थापन करुन ती २४ तास कार्यरत ठेवली जाणार आहे.
त्यामध्ये ३ ते ४ अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करुन प्रत्येक शिफ्टमधील अधिकारी कर्मचार्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या झोनसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्त यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
या परिसरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून तातडीची वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच ये-जा करणार्या व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कंन्ट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येणार आहेत व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स:शुल्क पुरविल्या जाणार आहेत.
या क्षेत्रातील रहिवाश्यांना आवश्यक असणारे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी शुल्क आकारुन महापालिका यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच या क्षेत्रातील सर्व बँकांनी नागरिकांसाठी बँकींग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या क्षेत्रातील सर्व पर्यायी रस्ते पोलिसांनी पत्रे तसेच बॅरिकेटस् लावून बंद केले जाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे मायक्रो कंन्टेन्मेंट झोन दि.२८ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे.