अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना बुधवार दि.29 सप्टेंबर रोजी महापालिकेत सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या समोर सुनावणी होणार आहे.
आरोग्याला घातक असलेल्या या मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिकेत लेखी अर्ज करण्याचे आवाहन अॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे.
फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात.
नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याने या टॉवरला स्थानिक नागरिकांचा आहे.
तरी देखील हा टॉवर उभारला जात असल्याने नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेत तक्रार करुन प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलन केले होते.
तसेच या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. या पाठपुराव्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने या मोबाईल टॉवर संदर्भात सुनावणी ठेवली आहे.
महापालिकेने लोकवस्तीमध्ये असलेल्या या फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी देताना टेलिकम्युनिकेशनचे नियम व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहिले नाही.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे जाणून न घेता चुकीच्या पध्दतीने परवानगी दिली. बुधवारी होणार्या सुनावणीसाठी मोबाईल टॉवर कंपनी समित डिजीटल इन्फ्रा लिमिटेडचे प्रतिनिधी, जागा मालक प्रमिला विजय कानडे व पिपल्स हेल्पलाईनचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
या सुनावणीसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
मोबाईल कंपनीला देखील या बैठकित विद्युत चंबकीय लहरीचा प्रादुर्भाव किती अंतरापर्यंत राहणार असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.