मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या सुनावणी संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे हवेत आहेत. त्यांना शिवसेना भवन, मातोश्री, सामनाचा ताबा हवाय. एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. कारण एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा. बाळासाहेबांचा मूळ पक्ष हा आमचाच आहे किंबहुना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलंय, उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केलं असं सांगायलाही हे कमी करणार नाही. महाराष्ट्रात जे चित्र दिसतंय, त्यात काहीही होऊ शकतं, असं यावेळी राऊत म्हणाले.
आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल. लोकशाहीची इतक्या उघडपणे हत्या कुणी करू शकणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होतोय. पक्षांतरबंदी कायद्याचं पालन केलं जात नाहीये. म्हणून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. देशाच्या लोकशाहीला एकमेव आशेचे किरण आता सर्वोच्च न्यायालय आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.