Ahmednagar News : अशुभ असते किंवा टिटवी ओरडली म्हणजे काही अशुभ घटनांचा संकेत असतो, अशी पूर्वापार समजूत आहे; परंतु एका टिटवीच्या ओरडण्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून हर्षवर्धन विनायक पवार हा २० वर्षे वयाचा तरुण युवक बालंबाल बचावल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील घारी येथे दि. २३ रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सध्या शेतीपंपासाठी घारी परिसरामध्ये रात्रीचा वीजपुरवठा सरू आहे. पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून शेतीला पाणी देणे भाग आहे.
अशा परिस्थितीत हर्षवर्धन पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या गड्यांना दुचाकीवर शेतात सोडण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना उंबरी नदीच्या कडेने रस्ता अतिशय अरूंद आहे, एका बाजूला नदी व एका बाजूला वेड्या बाभळी असा बिकट रस्ता आहे.
अशा रस्त्यावर समोर डाव्या बाजूला त्याला बिबट्या उभा असलेला दिसला. या कठीण समयी त्याला त्याचा मृत्यू समोर दिसला. तो मागेही परतू शकत नव्हता, कारण तेवढा वेळ नव्हता. मागचा रस्ताही अतिशय कठीण होता. तेवढ्या क्षणात त्याने पुढेच जाण्याचा निर्णय घेतला.
त्या आठ-दहा फूट रुंदीच्या रस्त्यावरून बिबट्याच्या अगदी जवळूनच जाणे भाग होते. त्याने जीव मुठीत धरून ‘मोटारसायकलचा वेग प्रचंड वाढवला बिबट्याच्या जवळून जात असताना बिबट्या त्याच्यावर झडप घालणार एवढ्यात एक टिटवी जोरात ओरडली आणि तेवढ्यावरच बिबट्याचे लक्ष विचलित झाले आणि वायू वेगाने त्याची मोटारसायकल तिथून पुढे गेली आणि त्याचा जीव वाचला.
पोहेगाव, घारी, चांदेकसारे, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक या परिसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर आहे; परंतु वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त झालेला नाही. पिंजरा तुम्हीच घेऊन जा त्यामध्ये भक्ष्यही तुम्हीच ठेवा अशी उत्तरे वनविभागातून मिळतात, असे काही नागरिकांनी सांगितले आहे.
त्यामुळे एकूणच वन विभागाच्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बिबट्या त्वरित जेरबंद करावा, अशी मागणी घारीचे सरपंच रामदास जाधव, उपसरपंच ठकुबाई काटकर, किसन काटकर, एकनाथ काटकर, अमोल जाधव, अजित जाधव, अमोल होन तसेच घारीसह डाऊच बुद्रुक परिसरातील नागरिकांनी केली आहे.