India News : डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषधे रुग्णांना द्यावीत, म्हणून औषध कंपन्यांनतर्फे डॉक्टरांना भेटवस्तू आणि इतरही सवलती दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही.
मात्र कोरोना काळात पॅरासिटामोलच्या Dolo 650 या गोळ्या डॉक्टरांनी शिफारस कराव्यात यासाठी संबंधित कंपनीने डॉक्टरांना सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. .
फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या सुनावणीच्यावेळी पुराव्यानिशी ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शानास आणून देण्यात आली आहे.
पॅरासिटामोल औषध Dolo 650 औषध बनवणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना भेटवस्तू देण्यासाठी १००० कोटींहून अधिक खर्च केल्याचा आरो वैद्यकीय प्रतिनिधींच्या या संस्थेने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात ‘डोलो’ हे औषध खूप लोकप्रिय झाले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. संस्थेतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय पारीख यांनी खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार, “डोलो कंपनीने 650mg फॉर्म्युलेशनसाठी १००० कोटी रुपयांहून अधिक मोफत भेट दिली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अहवालाचाही त्यांनी माहितीचा स्रोत म्हणून उल्लेख केला. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांच्या निर्मिती आणि किंमत नियंत्रणावर चिंता व्यक्त केली आहे.
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने संजय पारिख यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले.
न्यायालयाने आता केंद्राला एका आठवड्यात जनहित याचिकांवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे आणि १० दिवसांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल. ही गंभीर बाब आहे, असं खंडपीठाने म्हटले आहे.