अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं.
त्यांच्या याच विधानाला आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.
युतीबद्दल उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव संजय राऊत बोलू शकतात. रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे चांगले संबंध आहेत. मोदी आणि उद्धव ठाकरे हेच युतीबद्दल सांगू शकतात.
त्यामुळे मंत्री असताना असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.” असे चंद्रकांत खैरे म्हणाले. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद राज्यातील सर्व नागरिकांच्या परिचयाचा आहे.
अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असताना खैरे आणि सत्तार हे दोघेही नेते एकमेकांवर नेहमी टीका करत. त्यानंतर सत्तार शिवसेनेत आले पण त्यांच्यातील वाद मात्र कायम आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत.
त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.