एमपीएससीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ४० टक्के उमेदवारांची अनुपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची विविध पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी राज्यभरात सुरळीत पार पडली. मात्र, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी केवळ ६० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती.

यामध्ये तब्बल ४० टक्के उमेदवारांनी या परीक्षेकडे पाठ दर्शवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यभरातील १ हजार १६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर पडली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण अशा विविध कारणांमुळे एकूण सहावेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली. एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार नोंदणी आणि सर्वाधिक परीक्षा केंद्रे होती. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यात सर्वाधिक ४२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी २८ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली असून, जवळपास १४ हजार उमेदवार गैरहजर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यात परीक्षेसाठी उपस्थितांचे प्रमाण ६५ टक्क्यांच्या आसपास होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts