अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. नवीन जिल्ह्याधिकारी कार्यालय नगर औरंगाबाद रोड, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस आहे.(Ahmednagar New Collecter Office)
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीची ही कोणती नवी खेळी? यामागे काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेचे स्थानिक कारण आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसनेचे खासदार, मंत्री आणि अन्य नेते मात्र उपस्थित होते, हे विशेष.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगर जिल्ह्यातील दोन खासदार व बारा विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे असे एकूण १४ आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले होतं. प्रत्यक्षात या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
कार्यक्रमास उपस्तीत मान्यवर
कार्यक्रमाला मंत्री थोरात, गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, लहू कानडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पदमश्री पोपटराव पवार, राहीबाई पोपेरे यांचीच उपस्थिती होती. यामध्ये केवळ घुले याच फक्त राष्ट्रवादीच्या आहेत.
थोरातांबद्दल नेमकी कोणती नाराजी या नेत्यांना व्यक्त करायची आहे, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहता व्हिडिओ पाठवत शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी मात्र कार्यक्रमास येणे टाळले. सर्वांनीच पाठ फिरविल्याने ही ठरवून केलेली कृती आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.