अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- क्षेत्र कोणतेही असो आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत महिला आपले स्थान निर्माण करत आहे. यातच भारतीय वायुसेनेते अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा बहुमान पाथर्डी तालुक्यातील आयुषी नितीन खेडकर हिने पटकावला आहे.
बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत आयुषीचे नाव आले.यानंतर तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आयुषीचे अभिनंदन केले आहे. पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.
त्यामध्ये जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. तसेच, हमारी छोरी छोरों से कम नही… असेही त्यांनी म्हटलं आहे. आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे.’, असे ट्विट पंकजा यांनी केले आहे. आपल्या गावाकडील लेकीच्या गगनभरारीचा अभिमान असल्याचं पंकजा यांनी म्हटलंय.
दरम्यान आयुषी पाथर्डी येथील डॉ.नितीन खेडकर व डॉ.मनीषा खेडकर यांची कन्या आहे. ऑगस्ट 2020 ला तिने फायटर पायलट ची परीक्षा दिली होती.त्याचा निकाल काल जाहीर झाला.या परीक्षेत संपूर्ण देशातून 61 जणांची वायुसेनेत निवड झाली असून त्या मध्ये अकरा मुलींचा समावेश आहे.
भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहेत. तसा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. या परीक्षेसाठी आजवर मुलींना संधी नाकारल्याबद्दल कोर्टाने लष्कराला फटकारले आहे.
मात्र, यापूर्वी सैन्य दलातील विविध बटालियनमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, महिला अधिकारीही देशसेवा करत आहेत.माजी मंत्री पकंजा मुंडेंनीही अशाच एका मराठमोळ्या लेकीच्या गगनभरारीचं कौतुक केलंय.