Maharashtra Politics : नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नकार असतानाही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. मात्र, त्यांनतर शिंदे पुन्हा गोव्याला गेले आहेत.
त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना भेटून त्यांना ते सोबतच महाराष्ट्रात घेऊन येणार असल्याची माहिती आहे. मात्र, शिंदे यांच्या या कृतीमागे नेमके कारण काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे आता केवळ त्या आमदारांचे राहिलेले नाहीत. त्यांच्यावर आता राज्यातील बारा कोटी जनतेची जबाबदारी आहे.
तरी ज्यांच्या जोरावर बंड यशस्वी झाले, त्यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते गेले असावेत, असे सांगण्यात येते. असे असले तरी यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या एका वक्तव्याच्याही संदर्भ असल्याचे बोलले जात आहे. काल पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले होते, बंडखोर आमदार महाराष्ट्रात असते तर काही तरी करता आले असते.
मात्र, गुवाहाटीत आमदारांना भेटणेही अवघड झाले होते. पवा यांचे विधान गांभीर्याने घेऊन काही दगाफटका होऊ नये, यासाठीच तर शिंदे स्वत: गेले नसतील ना? अशी चर्चा आहे. येथे आल्यावर आमदारांना प्रथम विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आणि तर सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचे आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडून जपून पावले टाकली जात असल्याचे दिसते.