Agriculture Drone : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. दरम्यान भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा देखील समावेश झाला आहे.
ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फवारणी संदर्भातील अडचणी दूर होण्यास मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देखील समोर येत आहे.
वास्तविक कृषी ड्रोन चा भारतीय शेतीमध्ये वापर वाढावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सरकारकडून ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून ड्रोन खरेदीला मदत करण्यासाठी अनुदान देखील सरकारकडून दिले जात आहे. याशिवाय आता खाजगी क्षेत्रात देखील कृषी ड्रोनला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, कृषी ड्रोन फवारणीबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्विस कंपनी सिंजेंटा इंडिया प्रा.लि ने ड्रोन तयार करणारी कंपनी आयओटीटेकवर्ल्ड एव्हिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे. विशेष बाब अशी की या कराराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना कृषी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे जे प्रशिक्षित तरुण असतील त्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी या कंपन्यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. या करारानुसार 400 एकर क्षेत्रावर ड्रोन च्या माध्यमातून फवारणीसाठी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून तब्बल वीस पिकांवर फवारणी संदर्भातील हे प्रशिक्षण राहणार आहे. सिजेंटा कंपनीच्या कीटकनाशकांचा फवारणीमध्ये समावेश राहणार आहे.
तसेच ड्रोन हे आयओटीटेकवर्ल्ड एव्हिएशन या कंपनीचे राहणार आहेत. निश्चितच यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण तर लाभेलच शिवाय हाताला रोजगार मिळणार आहे. या दोन्ही खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्या असून सिजेंटा ही कंपनी तळागाळात पोहोचलेली आहे. यामुळे या कंपनीच्या माध्यमातून ड्रोन प्रशिक्षणासाठी प्रयत्न होणार असल्याने याचा निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांना मोठा बेनिफिट लाभणार आहे.