Agriculture News Today : गोगलगायी ही बहुपीक भक्षक कीड असून तिच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांसंदर्भात कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गोगलगायी रोपावस्थेत असणाऱ्या पिकांची पाने खाऊन नुकसान करतात.
मागच्या वर्षी जिल्ह्यातील अकोले व इतर तालुक्यात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, आगामी खरीपासह रब्बी हंगामातही गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास शेतकरी संबंधित तालुका कृषी कार्यालयात संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकतात. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबिले जातात. याबाबतची माहिती कृषी विभाग देते.
गोगलगायींचा कोणत्या पिकांना धोका
सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या पिकांना गोगलगायीचा अधिक धोका असतो. या पिकांना रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
गोगलगाय नियंत्रणासाठी काय कराल?
मशागतीची अवजारे स्वच्छ करून घेणे, शेताच्या बांधावर चुन्याची फकी टाकणे, शेताच्या चारही बाजूंनी तंबाखू पावडर १० किलो व राख २५ किलो प्रति एकर या प्रमाणात पसरावी. यामुळे प्रादुर्भाव फैलावत नाही आणि गोगलगायींवर नियंत्रण राहते
प्रादुर्भाव आढळल्यास हे करा –
मोठ्या गोगलगायी गोळा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून खडे मीठ अथवा चुना टाकून पोत्याचे तोंड घट्ट बंद करावे. सायंकाळच्या वेळी शेतात सर्व भागात गवताचे ढीग प्रति एकर चार ते पाच ठिकाणी किंवा प्रादुर्भावानुसार अधिक ठिकाणी ठेवावे.
सकाळी ढिगाखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात.गवताऐवजी दहा लिटर पाण्यात एक किलो. गूळ टाकून सुतळी बारदाना भिजवून तो नऊ ते दहा ठिकाणी सायंकाळच्या वेळी ठेवून सकाळी त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून वरीलप्रमाणे जमा करून त्या नष्ट कराव्यात.
गोगलगायनाशकाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा. शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायींचे नियंत्रण लवकरात- लवकर व अधिक प्रभावीपणे होते.
फळबागेमध्ये झाडांच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.