अहमदनगर ब्रेकिंग : आमदार लंके आक्रमक ! म्हणाले मंत्र्यांच्या दालनातच उपोषण करतो ….

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पारनेर तालुक्यातील वन विभागाच्या कामांसंबंधी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.

यावर आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर वन मंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी भवनाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

एका बाजूला विरोधक सरकारवर आरोप करून अडचणीत आणू पहात आहेत. आता एका सरकारी विभागातील भ्रष्ट्राचाराची तक्रार करून सत्ताधारी पक्षातील आमदारानेच सरकारला धारेवर धरल्याचे पहायला मिळाले. पारनेर तालुक्यात वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांत सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा लंके यांचा आरोप आहे.

मातीनाल बांध व गॅबियन बंधार्‍यांची कामे करताना नियमानुसार निविदा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. तसे न करता सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच अतिरिक्त कार्यभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी नियमांचे पालन केले नाही. मनमानी पद्धतीने कामांचे वाटप केले आहे. गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले, त्या मजुरांच्या नावावर मजुरी न देता वेगळ्याच मजुरांची नावे वापरून बिले काढली आहेत,

असा आरोप त्यांनी केला आहे. यावर वन राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे यांनी आठ दिवसांत चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वन मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office