अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप अडचणीत ! आमदार व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा …..

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  जाहिरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन देणार्‍या शहराच्या आमदारावर व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल व्हावा -संदीप भांबरकर जिल्हा न्यायालयात आमदार संग्राम जगताप व प्रचार करणाऱ्या सर्व तरुण यांच्यावर पुराव्यानिशी खासगी दावा दाखल गुरुवारी प्रथम सुनावणी व मुख्य निवडणुक आयोगाकडे हीं तक्रार दाखल.

विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला आहे.

या अर्जावर गुरुवार दि.23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच माहिती अधिकारात एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कची माहिती घेतली असता, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांच्या 26 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकान्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रातून आयटी पार्क वगळण्यात आला आहे.

तर ती जागा इतर उद्योजकांना भाडे तत्वावर देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन आमदारांनीआयटी पार्क उभे करुन मतदारांची जाहिरनाम्याद्वारे दिशाभूल केली असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे. अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्कचा विषय चांगलाच गाजत असताना,

सामाजिक कार्यकर्ते भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात पुराव्यानिशी दावा दाखल केल्याने आयटी पार्क वरुन शहरातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आयटीपार्क सुरु केला असल्याचे दर्शवले.

तर युवक-युवतींना आयटी पार्कमध्ये रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे जाहीर केले. काही तरुण-तरुणींनी व्हिडिओद्वारे आयटी पार्क चालू झाला असून, आंम्हाला रोजगार मिळाल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते भांबरकर यांनी आयटी पार्कबद्दल माहिती घेतली असता शहरात आयटी पार्कच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्क विषयी माहिती मागितली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती त्यांना 10 ऑगस्ट रोजी मिळाली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाचे असे म्हणणे आहे की,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांचे परिपत्रक 26 ऑक्टोंबर 2016 अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे. सदर आयटी पार्कची जागा इतर उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

या पत्रावरुन आमदार जगताप यांनी सर्व मतदार व नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे भांबरकर यांनी म्हंटले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जाहिरनाम्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून, तसेच निवडणूक प्रचारात आयटी पार्क चालू केला आहे असे खोटे सांगितले आहे.

प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणारे युवक-युवती यांनी देखील फसवणूक केली असल्याचे भांबरकर यांचे म्हणने आहे. यावरुन आमदार व खोटी माहिती सांगणारे युवक-युवतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला होता.

मात्र पोलीस स्टेशनने हा अर्ज स्विकारला नाही. यानंतर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. त्यावर कारवाई झाली नसल्याने जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल करण्यात आला आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. निवडणुकीमध्ये खोट्या जाहीरनाम्याच्या आधारे निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी अपात्र ठरवून,

त्यांना कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी भांबरकर यांनी मा.सुप्रीम कोर्ट, मा.मुंबई उच्च न्यायालय व मुख्य निवडणुक आयोगाकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणी औरंगाबाद खंडपिठात देखील जनहित याचिका दाखल करण्याचे त्यांनी म्हंटले आहे.

निवडणुकीमध्ये उमेदवार खोटे जाहीरनामे प्रसारित करून व खोटे आश्‍वासन देऊन मतदारांची फसवणूक करुन निवडून येतात. ही लोकशाही व संविधानाचा अपमान आहे. अशा प्रकारामुळे सामान्य नागरिकांचा निवडणूकांवरील विश्‍वास उडेल. खोटे आश्‍वासन देऊन निवडून येणार्‍या उमेदवारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे – संदीप भांबरकर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts