अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर- मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाईनजीक डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला.
त्या अपघातात एक मोटारसायकल चालक व तर टँकरचालक दोघेही ठार झाले. चालकाचे नाव समजू शकले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की टॅँकर ओव्हरटेक करत करताना हा अपघात झाला.
यात एक मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना तो मयत झाला, तर टँकरखाली दबल्याने टँकर चालकाचाही मृत्यू झाला.
कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर (क्रमांक एमएच ४६ बीबी ३०६६) हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना उलटला. टॅंकर भरधाव वेगात असल्याने टँकर चालकाचे टॅँकरवरील नियंत्रण सुटले.
उलटलेला टॅंकर बाजुला काढण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले होते. मुंबई- नागपूर महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
घटनास्थळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून फोमद्वारे टँकरवर फवारणी करण्यात आली. दोन रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाल्या होत्या.
संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाला या अपघाताबाबत कळविण्यात आले. टँकर उभा करण्यासाठी क्रेनही मागवण्यात आल्या होत्या.