अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शेतातील घरात नामदेव बबन भुतांबरे (वय 40) व मनिषा नामदेव भुतांबरे (वय 14) रा. नादूंर खंदरमाळ तरसेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. बाळापूर या वडील व मुलीने शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुतांबरे कुटुंब हे कामानिमित्त उंबरी बाळापूर येथे आले होते. शनिवारी दुपारी घरामध्ये नामदेव भुतांबरे व मनिषा भुतांबरे या दोघांनी तारेच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
बाळापूरच्या कामगार पोलीस पाटील वैशाली मैड यांनी आश्वी पोलिसांना याबाबत खबर दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष भोये व त्याच्या सहकार्यानी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली.
यावेळी सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, अशोक भुसाळ, अनिल भुसाळ आदींसह परिसरातील नागरीक घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान वडील व मुलीने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नसून आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.