अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-एकीकडे देशभरात पेट्रोल, डिजेल, घरगुत्ती गॅस या दैनंदिन लागणाऱ्या इंधनासह खाद्यतेलाच्या किमती दिवसेंदिवस माठ्या प्रमाणात वाढत आहेत, मात्र दुसरीकडे शेतमालाच्या किमती सपाटून पडलेल्या आहेत.
आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथी, कोथिंबीरीच्या एका जुडीला अवघे ६ रूपये तर टोमॅटो १० रूपये किलो, तर कोबीला अवघा ५ रूपये किलोचा दर मिळाला.
दुष्काळ, कोरोना, अतिवृष्टी ही मोठी संकटे झेलत शेतकरी मोठ्या कष्टाने मात्र तितक्याच जिद्दीने उभा आहे. मात्र त्याच्या या जिद्दीला कोसळत्या बाजारभावाने सुरूंग लावण्याचे काम केले आहे.
आज देशात इंधनाचे दर प्रचंड वेगाने वाढत असताना दुसरीकडे मात्र शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. या मोठ्या तफावतीमुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर (क्विंटलमध्ये) :- वांगी ८०० – १५००, गवार ७००० – ९०००,कारले ३००० – ३५००, वाटाणा २००० – ३०००, भेंडी २००० – ३०००,बटाटे ७०० – १२००, लसूण ६००० – १००००, हिरवी मिरची २००० – ३०००, लिंबू २००० – ३५००.