Ahmednagar News : नगरचे सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते किरण काळे यांनी केला. तसेच काही फोटो व्हायरल करत त्यांनी याचा भांडाफोड केल्याचे सांगितले जात आहे.
आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट सिव्हील हॉस्पिटल गाठले. कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.
याची कुणकुण लागतातच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी खाजगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटांत आरोपी औटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला. ही ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे असा घणाघात काँग्रेस नेते किरण काळे यांनी केला आहे.
औटीला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता, असा गंभीर आरोप काळे यांनी करत आम्ही सतर्कता दाखवल्यामुळे पोलिसांचा इरादा कार्यसिद्धीस जाऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक
तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह मविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच किरण काळे यांनी ड्युटीवर असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काळे म्हणाले की,
आम्ही आधी ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना आरोपीला आलिशान सुविधा का दिला जात आहेत ? बिर्याणीने त्याचा पाहुणचार का केला जात आहे ? त्याला फोन कोण पुरवत आहे ? तो मोबाईल वरून कोणाशी संपर्क साधत आहे ? आरोपी औटी मोबाईलवरून रुग्णालयात असताना देखील बोलत असल्याचा फोटोच त्यांनी पुरावा म्हणून दाखवला. मात्र या सर्व गोष्टींवर कोणती ही उत्तरं सीएमओ देऊ शकले नाहीत असे काळे यांनी म्हटले आहे.
तहसीलदारांच्या आदेशानेच आरोपी रुग्णालयात ?
दरम्यान, याबाबत पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले आहे की न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विजय औटीला रुग्णालयात दाखल करण्याबाबत तहसीलदारांचे ३१ जुलैला पत्र प्राप्त झाले होते.
या संदर्भात ठाणे अंमलदारांनी तहसीलदारांना फोन करून खात्री केली. त्यानंतरच औटीला पारनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्ह्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथून त्याला मंगळवारी रात्री पुन्हा पारनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथून त्याला कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
तहसीलदार म्हणतात माझा संबंध नाही
याबाबत पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौदाणे यांच्याशी संपर्क केला असता तहसीलदारांचा आरोपीशी कोणत्याही संबंध नसतो. हे काम पोलिसांचे असून याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.