अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी आणि एका प्रथितयश दैनिकाच्या नगर आवृत्तीचा संपादक डॉ बाळ बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कुडतरकर यांनी फेटाळला.
शहरातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातुन कार्यरत होत्या.मयत जरे आणि बाळ बोठे यांचे नाजुक मैत्रीपूर्ण संबंध होते.
याच संबंधात विसंवाद झाल्याने बोठे याने मयत जरे यांचा छळ सुरू केला होता. त्याचप्रमाणे जरे यांचे इतर सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या शहरातील इतर जणांशी असणाऱ्या सलगीचा संशय घेऊन बोठे याने जरे यांचा अतोनात छळ केला होता.यातूनच बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणल्याचा सरकार पक्षाने कोर्टात दावा केला.
यासाठी बोठे याने आरोपी सागर भिंगारदिवेच्या माध्यमातून कटाची रचना केली.मयत जरे यांच्या आई व या प्रकरणातील तक्रारदार सिंधूबाई वायकर यांना गुडग्यावरील उपचाराच्या निमित्ताने पुण्याला पाठविण्याचे नियोजन करून तशी माहिती आरोपी भिंगारदिवेच्या माध्यमातून आरोपी चाळके मार्फत मुख्य मारेकरी ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिंदे व फिरोज शेख यांना बोठे पोहचवत होता.
जरे यांच्या पुणे-नगर या परतीच्या प्रवासातील मिनिटां-मिनिटांची माहिती मयत जरे यांच्याकडून घेऊन आरोपी बोठे मुख्य मारेकरी यांच्यापर्यंत पोहचवत होता.जरे या कुटुंबासह सुपा येथील जातेगाव घाटात पोहचल्यानंतर, आरोपी शिंदे व फिरोज शेख या कंत्राटी मारेकर्यानी त्यांच्या मोटरसायकलला जरे यांच्या गाडीने कट का मारला,
असे कारण काढून धारदार शस्त्राने जरे यांचा गळा चिरून निर्घृण खून केला. या खुनासाठी बोठे याने आरोपी भिंगारदिवेच्या माधमातुन इतर आरोपीना बारा लाख रुपयांची सुपारी देणे,घटनेदिवशी आरोपीमध्ये असणारा सततचा संपर्क,मयत आणि बोठे यांच्यातील मोबाईल संभाषणाच्या फिती,इतर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला ऐवज व रोख रक्कम,
घटनास्थळावरून आरोपी फिरोज शेख याने जरे यांचा फोटो इतर आरोपीच्या माध्यमातून बोठे याला पाठवून त्या जरेच असल्याची खात्री करून त्यांची हत्या करून घेणे, हे सर्व मुद्दे प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडून विशेष सरकारी वकील यादव-पाटील यांनी बोठे याच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला.
यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आज बोठे याचा जामीन अर्ज फेटाळला. घटनास्थळावर मयत जरे यांच्या मुलाने काढलेल्या आरोपी फिरोज शेख याच्या छायाचित्राने तपासाची दिशा स्पष्ट होऊन स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या काही तासातच मारेकऱ्यांना अटक केली.
त्यांच्याकडे अधिक तपास करत असताना कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून नगरमधील एका प्रथितयश दैनिकाचा तत्कालीन संपादक डॉ बाळ बोठे याचे नाव निष्पन्न झाल्याने वृत्तपत्रसृष्टीत तसेच राज्यात खळबळ उडाली होती.त्यानंतर बोठे जवळपास तीन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
त्याला अखेर तेलंगाणा येथे शिताफीने अटक करून येथे आणण्यात आले होते.नगर ग्रामीण पोलिसांनी मेहनतीने बोठे याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नगर ग्रामीण पोलिसांनी मुंबई येथील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी केली होती,त्यास गृह खात्याने मान्यता देऊन यादव यांची या खटल्यात नेमणूक केली होती.आरोपीतर्फे महेश तवले यांनी काम पाहिले.