अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे मिनीटाला 600 एलपीएम आॉक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आला.
आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदिप सांगळे यावेळी उपस्थित होते.
जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेतून या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या दुसर्या लाटेत उपचार सुरु असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या आॉक्सिजन वायूची कमतरता मोठया प्रमाणावर निर्माण झाली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने जिल्हा आॉक्सिजन निर्मितीमधे स्वयंपूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
या प्रयत्नाचा एक भाग असलेल्या हवेतुन आॉक्सिजन निर्मिती करण्यात येणार्या प्लँटची उभारणी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली आहे. या प्लँटच्या निर्मितीसाठी 1 कोटी 53 लक्ष रुपये खर्च आला आहे. एका मिनिटात सहाशे एलपीएम आॉक्सिजनचा पुरवठा या प्लँटच्या माध्यमातून होणार असून 24 तासांत 125 जंबो सिलेंडरचा पुरवठा करण्याची क्षमता या प्लँटची क्षमता आहे.
जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांनी कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले. आरोग्य सुविधांमुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभारंभानंतर प्लँटची पाहणी करून घेतली आणि तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती घेतली. श्रीगोंद्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे तहसीलदार चारुशिला पवार, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघर्ष राजुळे, स्थानिक पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते होते.