Ahmednagar News : वाळूचे कण रगडीता तेलही गेले… केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे.. अशा आपल्याकडे काही म्हणी आहेत. या म्हणी आठवण्याचे कारण म्हणजे अहमदनगरमधील एक युवक.
या म्हणीला अनुसरून त्याने कर्तृत्व करून दाखवले. या युवकाचे नाव आहे अमोल आग्रे.
अमोलची घरची परिस्थिती बेताची.. वडील शेती व्यवसाय करत असल्याने संपूर्ण कुटुंब त्यावर अवलंबून.. पण अमोलच्या आई-वडिलांनी उच्च शिक्षण देण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला.. शालेय शिक्षणही जिल्हा परिषद शाळेत.. कष्टाच्या जोरावरच कठोर मेहनत घेऊन अमोल आग्रे हा पोलीस बनला…
अमोल याने मिराभाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबल पदाला गवसणी घातली आहे. म्हैसगावच्या मुळा थडीत वसलेल्या डोंगराळ भागातील आग्रेवाडी या गावातील भास्कर आग्रे यांचा मुलगा.
अमोलचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आग्रेवाडी नंतर इयत्ता १० वीचे श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथे झाले. १२ वीचे शिक्षण वरवंडी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात तर पदवीधरचे शिक्षण वायसीएममधून सह्याद्री कॉलेज संगमनेर येथे झाले.
अमोलच्या याच मेहनतीवर त्याने पोलीस भरतीचे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल होण्याचा बहुमान मिळविला आहे. आता त्याच्या या यशाबद्दल म्हैसगाव ग्रामस्थांसह अनेक
मान्यवरांनी अमोल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत , कष्ट, जिद्द याच्या जोरावर अमोल हा पोलीस झाला व कुटुंबियांच्या कष्टाचे सोने झाले.
नवतरुण युवकांसाठी अमोलची कहाणी खरोखर प्रेरणा देणारी आहे. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आहे त्या स्थितीत जर कष्ट केले, अभ्यास केला, प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते हाच धडा जणू अमोल यांनी नवतरुणांना दिला असे म्हणावे लागेल.