Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील गोळेगाव रस्त्यानजीक आघाव वस्तीवर राहणाऱ्या एका शेतकरी दाम्पत्याला चोरट्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास लाकडी दांडा व कुन्हाडीने मारहाण करत गंभीर जखमी करून अंगावरील दागिन्यांची लूट केली.
तसेच शेकटे खुर्द येथील बाळूबाई तांड्यावरील एक शेतकरी दाम्पत्य रात्री साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलने शेतात जात असताना चकलांबा रोडला मुंढे चौकानजीक अडवणूक करून चोरट्यांनी त्यांना गंभीर मारहाण करून सोन्याचे दागिने व मोबाइल लुटून पोबारा केला. ही घटना बुधवारी (दि.१४) व गुरुवारी (दि.१५) रात्री घडली.
दरोडेखोरांच्या टोळीने बोधेगाव शिवारातील गोळेगाव रस्त्यालगत आघाव वस्तीवर हल्ला चढविला. आघाव कुटुंबातील घरात झोपलेल्या लोकांना हातपाय बांधून कोंडले. तर लगत पडवीत झोपलेल्या महिलेकडे मोर्चा वळवून
धारदार शस्त्र व कुऱ्हाडीने जबर मारहाण करून महिलेच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्याच्या टोळीने लांबविला. या घटनेत बाळू बाबुराव आघाव व त्यांच्या पत्नी संगिता या गंभीर जखमी झाल्या आहेत.
संगिता यांच्यावर कुऱ्हाडीचा हल्ला झाल्याने त्याही गंभीर जखमी झाल्या असून त्यांनाही अधिक उपचारासाठी नगर येथे दाखल केले आहे.बोधेगाव परिसरातील काकासाहेब मिसाळ यांच्या घराकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला.
तोपर्यंत परिसरात चोरटे आल्याची माहिती मिळाल्याने मिसाळ कुटुंब जागे असल्याने या ठिकाणी दरोडेखोरांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर लाडजळगाव परिसरातही एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. त्यात एकजण जखमी झाला असून त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ग्रामसुरक्षा यंत्रणेडून चोरीची घटना समजताच ग्रामस्थ सतर्क झाले होते. यावेळी चोरी करून पळ काढताना चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला.
यावेळी चोरटे पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरील अकोलकर वस्तीनजीक दुचाकी टाकून शेत रस्त्याने उसातून पसार झाले. सदरील घटनेतील दुचाकी व कुहाड पोलिसांनी हस्तगत केली आहे अशी माहिती समजली आहे.