Ahmednagar Politics : भारतीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होणार असे आज स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यात विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.
उबाठा शिवसेना पक्षाचे माजी मंत्री तथा नेवासा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी देखील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेवासामध्ये नुकताच निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यातून गडाख यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल असा विश्वास व्यक्त करत महायुती सरकारला धारेवर धरले आहे.
यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिला. गडाख यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला मतदारसंघातील हजारो लोकांनी गर्दी केली होती. खरंतर अजून महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार फायनल झालेले नाहीत.
मात्र लवकरच दोन्ही गटांकडून उमेदवार फायनल केले जातील अशी आशा आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये अगदी सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.
पण, सध्याचे चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना महाविकास आघाडी कडून संधी मिळण्याची शक्यता आहे. नेवासाची जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल आणि येथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार गडाख उभे राहतील अशी शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर गडाख यांनी विधानसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघात निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी ही लोक इथं उपस्थित झाली असून यातून यंदाच्या निवडणुकीत राज्यात जनता महाविकास आघाडीलाच कौल देणार असे दिसत असल्याचे मत गडाख यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अन शेतमालाला रास्त भाव मिळणार अशी ग्वाही देखील गडाख यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकार महाविकास आघाडीच्या आमदारांची अडवणूक करत असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम महायुतीने केले असल्याचा आरोप करत महायुती सरकारचा चांगलाचं समाचार घेतला.
तसेच यावेळी सर्वसामान्य जनतेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून यासाठी शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन देखील केले.
गडाख उद्धव ठाकरे साहेबांसोबतच
गडाख यांनी निर्धार मेळाव्यात आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार असे स्पष्ट केले. ते म्हणालेत की महाविकास आघाडी सरकारमध्ये मला मंत्री पदाची संधी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी मंत्री झालो. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून जनतेने पुन्हा संधी दिली तर आता जे काम केले आहे त्यापेक्षा डबल काम करणार असे म्हटले आहे.
त्यांनी माझ्याबद्दल मतदारसंघांत काहीजण विशेष करून विरोधक गैरसमज पसरविणाऱ्याचा धंदा करत आहेत. म्हणून या विरोधकांपासून सावध राहा. महाविकास आघाडीच्या छताखाली सर्वजण एकत्र येत आहेत. यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यांना मोठेपण सहन होताना दिसत नाही. त्यामुळे आपलं सरकार बनवण्यासाठी पक्का निर्धार करा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले आहे.