अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- मुंबईत अकोल्याचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीवरून चांगलेच आक्रमक झाले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विषयाला थेट हात घातला.
हा विषय इथे बोलण्याची वेळ नाही, पण मला राहवत नाही असे म्हणत पवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काहींनी गंमत केली.
ही गंमत माझ्या चांगलीच लक्षात आली आहे. कोणत्या तालुक्यात कोणी काय केले हे मला माहित आहे. थोड दिवस जाऊ द्या, गडबड करणार्यांची गंमत कशी करतो ते पहाच आता.
राष्ट्रवादीने बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल पुरस्कृत केल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या काहींना सोबत घेऊन भेदभाव न करता विश्वासाने राहणे आवश्यक होते.
मात्र, प्रशांत गायकवाड यांच्या निवडणुकीत काहींनी गडबड केली. आपल्यात राहयचे आणि दगाबाजी कराची हे बरोबर नाही, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, या शब्दांत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत करामती करणार्यांचे कान उपमुख्यमंत्री पवार यांनी उपटले.
दरम्यान, कार्यक्रमानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गंमती आणि गडबड करणारे कोण आहेत आणि त्यांच्यावर अजित पवार काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.