अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सध्या सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.
त्यामुळे राजकारण चांगलेच रंगात आले असून बऱ्याच जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक राजकीय समीकरणे पहायला मिळाली.
जामखेडमधून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थक उमेदवाराचा मार्ग मोकळा करून दिला.
आता उपमुख्यमंत्री पवार यांनीही अकोल्यात असेच राजकारण फिरवत भाजपमध्ये गेलेल्या पिचड समर्थक गायकर यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
राजकारणातील जुने रुसवे फुगवे :- गायकर हे पिचड यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी पिचडांसोबतच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी जिल्हा बँकेत पवार यांनीच गायकर यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली होती.
त्याची जाणीव न ठेवल्याने पवार त्यांच्यावर संतापले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात अकोले तालुक्यात झालेल्या प्रचार सभेत पवार यांनी गायकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
सभेला कार्यकत्यांनी गायकर यांचे काय करणार, असा प्रश्न विचारल्यावर पवार भाषणात म्हणाले होते, ‘त्यांचे काय करायचे ते मी करतो. त्यांचे नाही धोतर फेडले तर मग पाहा.’ असा थेट इशाराच पवार यांनी दिला होता.
त्यामुळे यापुढील राजकारणात पवार पिचड यांच्यासोबतच गायकर यांचीही अडचण करणार, असे मानले जात होते. प्रत्यक्षात मात्र उलटेच चित्र पहायला मिळाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गायकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख यांनी आपण अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानत आपण ही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पवार यांनी आपल्याला कारखान्यात सहकार करण्याचा शब्द दिल्याचेही सांवत यांनी सांगितले आहे.
हे राजकारण करताना माजी आमदार वैभव पिचड यांच्याविरुद्धचा उमेदवार मात्र अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यात आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोले तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यातून पिचड यांना दूर करण्याचे आवाहन केले होते.
त्यामुळे पवार कुटुंबीयांचा पिचड यांच्यावर राग कायम असून त्यांच्यासोबत गेलेल्यांना परत खेचून आणि पिचड विरोधकांना ताकद देऊन पिचड यांची कोंडी करण्याचा पवार यांचा राजकीय डाव असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.