अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली आहे.
त्यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन आढळल्याचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले नसल्याचे कारण देत गृहमंत्र्यांनी १७ मार्च रोजी परमबीर सिंह यांची बदली केली.
त्यानंतर गृहमंत्र्यांनी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपये वसुलीचे कथित उद्दिष्ट दिल्याचा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला.
त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सीबीआयने देशमुख यांचे घर आणि कार्यालयांवर छापे मारून ११ तास चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कुचराई, अधिकारांचा गैरवापर केल्याचे आरोप ठेवत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यास देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि कोणत्याही कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.