अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला इशारा देणारे महत्त्वाचे वक्तव्य करणारे प्रसिध्दीपत्रक अण्णा हजारे यांनी काल काढले आहे.
त्यानंतर शुक्रवारी अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबिर घेतले होते. अण्णा हजारे यांनी आता देशपातळीवर संघटना बांधणीचे काम सुरू केलं आहे. देशातील १४ राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये झाले.
यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, ‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. सगळे सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा परिस्थितीत जनसंसद मजबूत झाली पाहिजे.
या माध्यमातून लोक जागे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही पाडले जाऊ शकते,’ असं म्हणत अण्णा हजारे यांनी दीर्घकालीन नियोजन करून कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि सरकार टीकास्त्र सोडलं. कोणत्याही राजकीय पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही, असं परखड मत त्यांनी यावेळी मांडलं. “सर्वजण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्याच्या पाठी पडले आहेत.
कोणतंही सरकार स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार समजत असेल. तर जनसंसद शक्तिशाली करा की, सरकार पडेल. देशाला वाचवण्याचा दुसारा रस्ता नाही.”, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
“काँग्रेस असो की भाजपा कोणत्याही पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही. देशात बदल घडवायचा असेल, तर सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यावर जनसंसदेच्या माध्यमातून दबाव आणला गेला पाहीजे.
२०११ च्या लोकपाल आंदोलनात आम्ही हाच संकल्प घेऊन टिम तयार केली होती. मात्र काही लोकांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि टिम विस्कटली. कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी राज्यपाल, तर काही जण मंत्री झाले. यामुळे देशाचं नुकसान झालं.”, असा निशाणा अण्णा हजारे यांनी साधला.
“काही जण माझ्यावर मुद्दाम टीका करतात. पण मी तिथे लक्ष देत नाही. ते माझं काम नाही. माझं काम समाज आणि देशासाठी आहे. सत्य कधीच पराजित होत नाही. माझा काही स्वार्थ नाही. मी ४६ वर्षांपासून मंदिरात राहात आहे. माझ्याकडे खाण्यासाठी ताट आणि झोपण्यासाठी बिछाना इतक्यात गोष्टी आहेत.
मला कोणत्याच राजकीय पक्षाशी देणंघेणं नाही. मी फक्त देश आणि समाजाचा विचार करतो”, असं देखील अण्णा हजारे यांनी सांगितलं. “मी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आंदोलन करत आहे.
२३ मार्च २०१८ आणि ३० जानेवारी २०१९ रोजी मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. दिल्लीत गेल्या ९ महिन्यांपासून जे शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी एक दिवसाच उपोषण देखील केलं. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत जराही गंभीर नाही. कृषी उत्पादनावर सी२ अधिक ५० टक्के एमएसपी लागू केली पाहीजे. यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती गठित करण्याचं लिखित आश्वासन दिलं आहे”, असंही त्यानी पुढे सांगितलं.
दरम्यान, या शिबिरात राष्ट्रीय पातळीवरील संघटन पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारीचं वाटपही करण्यात आलं आहे.यावेळी देशभरातील 14 राज्यातील 86 कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शिबिरात सहभाग घेतला होता.
जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान) भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई) योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथ भाई (राजस्थान), विकल पचार (हरियाणा), विष्णू प्रसाद बराल (आसाम), दयानंद पाटील (कर्नाटक) प्रविण भारतीय (उत्तर प्रदेश), अशोक मालिक (हरियाणा) आदींसह देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.