अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पूर्वी राजकीय कार्यकर्त्यांनी समाजाशी एकरूप होऊन काम करावे यासाठी राजकीय पक्षांकडून नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करण्यात यायचे. त्यातून समाजसेवेचे भान असलेले कार्यकर्ते घडत.
मात्र राजकीय पक्षांच्या कार्यशाळा बंद झाल्या. त्यामुळे समाजसेवेचे धडे कार्यकर्त्यांना मिळत नाही. सध्या राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी केला जातो, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
राळेगण सिद्धी ते वाडेगव्हाण फाटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हजारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अशोक सावंत,
बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, संभाजी रोहोकले, आत्मा समितीचे तालुकाध्यक्ष राहुल झावरे, पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, राळेगण सिध्दीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, राजेंद्र चौधरी, किसन रासकर, बापू शिर्के, पूनम मुंगसे, कारभारी पोटीं,
अभय नांगरे, दत्ता आवारी आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक हजारे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील माझ्यासाठी आदर्श होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार नीलेश लंके काम करीत आहेत.
राजकारणाच्या पलिकडे जाऊन आमदार लंके समाजासाठी काम करीत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासमवेत राजकीय व्यासपीठावर उपस्थित आहे. अन्यथा मी कधीच राजकीय व्यासपीठावर उपस्थित रहात नाही.