Maharashtra news:नव्या सरकारच्या स्थापनेत धक्कादायक निर्णय घेण्याची भाजपची मालिका सुरूच आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना भाजपने एका युवा उमेदवाराला यासाठी उमेदवारी दिली आहे.
भाजपचे मुंबईतील युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवार देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष बदलून आले आहेत. शिवसेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
आधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवत भाजपने धक्कातंत्र अवलंबले होते. त्याची चर्चा संपत नाही तोच एका युवा आमदाराला ज्येष्ठांसाठीचे आणि सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचे असलेल्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार? आणखी काय काय खेळ्या होणार , याकडे लक्ष लागले आहे.