AhmednagarLive24 : किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारी प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.
त्यांना ४ जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.राऊत यांनी किरीट आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली, त्यातील १६ शौचालयं बांधण्याचं कंत्राट हे डॉ. मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते.
या कामात बनावट कागदपत्रं सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता.
त्याला उत्तर देताना मेधा सोमय्यांनी यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा दावा करत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.