अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे.
पारनेर उपकारगृहात आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा वापर बाळ बोठे यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपाधिक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
बाळ बोठेने मोबाईलचा वापर केल्याने त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. मागच्या महिन्यात उपाधीक्षक अजित पाटील , तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी पारनेर उपकारगृहाची झडती घेतली होती.
यावेळी कारगृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश नीलेश कर्डिले यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले होते. त्यांना जेवण देणाऱ्या सुभाष लोंढे, प्रवीण देशमुख यांनी हे मोबाईल आरोपींना पोहोच केले होते. त्यामुळे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
यांच्या तपास पोलिस निरीक्षक करीत आहेत . ज्या बराकीत मोबाईल सापडले तेथे बाळ बोठेला ठेवण्यात आले होते. त्यामुळे बोठेने त्या मोबाईलचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होता.
त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करत असता बोठे याने त्या मोबाईलचा वापर केला आहे. त्यामुळे बोठेला कारागृहात मोबाईल वापरणे प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी केला जाणार आहे.