अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-आतापर्यंत राजकारणात या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करून भूकंप करण्याची पद्धत होती. मात्र कर्जतमध्ये सध्या सर्व बदलत आहे, नवे पर्व सुरू आहे, त्यामुळे येथे मित्र पक्षात राहून पक्षांतर न करताही भूकंप करून दाखविण्याची गंमत कर्जत मध्ये काहींनी करून दाखवली.
या भूकंपाचे, गंमती जमतीचे हादरे थेट वरिष्ठांपर्यत बसले आहेत. कर्जत तालुक्यात नुकताच राजकीय भूकंप झाला व त्याचे हादरे थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठापर्यत बसले. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत हाताशी असलेल्या ४५ मतांपैकी अवघे ३६ मते पडल्याने काँग्रेसच्या मिनाक्षीताई साळुंके यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यावर शरसंधान साधून आ.रोहित पवार यांना दाखवून देण्याच्या बदल्यात त्याच्याच पक्षातील काही लोकांनी कार्यक्रम केला. मात्र आमचा त्यात बळी गेला असा थेट हल्ला केला होता.
यावर राष्ट्रवादीकडून अथवा आ. रोहित पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे काँग्रेसने केलेली टीका योग्यच होती अशी चर्चा सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रकरणावर थेट भाष्य केल्याने तालुक्यात याबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांनी जाहीररित्या बोलताना जिल्हा बँक निवडणुकित सर्वानी विश्वासाने राहायला पाहिजे होते. अहमदनगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली. कशी व कुणी केली हे मला माहीत आहे. असे म्हणत सर्वानाच अवाक केले. थोडे दिवस जाऊ द्या, नंतर बघतो एकेकाला, असा सज्जड दम ही पवार यांनी भरला.
यावेळी बोलताना ते म्हणाले जर ४५ मते आमच्याकडे बारामतीत होती तेथून ती सकाळी मतदानाला गेले व आपल्या उमेदवारांला मतदान झाले ३६ तर ९ मते कोठे गेली. हे सर्व प्रकरण आपल्या लक्षात आहे असे म्हणत काहींना जमतंय असे वाटते आहे, काहींना गंमत करण्याची सवयच लागली आहे.
जमतंय जमतंय असे त्यांना वाटते आहे, आता पाहतो कसं जमतंय असले लाड खपवून घेतले जाणार नाहीत. जे आहे ते समोरा समोर होऊन जाऊ द्या. आम्हाला हे योग्य वाटत नाही आम्ही ही भूमिका घेऊ ते समोर सांगा, आम्हाला त्याचे काही वाटणार नाही.
पण आता असले लाड ही खपवून घेणार नाही असा सूचक इशारा प्रदेशाध्यक्षा समोरच नेमका कुणासाठी दिला आहे. याबाबत आता कर्जत तालुक्यात चर्चा सुरु झाली असून राष्ट्रवादी खरोखर गंमत करणाऱ्या व्यक्ती कडे गांभीर्याने पाहणार आहोत की ते ही गंमतच करणार अशी ही चर्चा होउ लागली आहे.