Maharashtra News: राज्यातील साखर कारखान्यांचा यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होताच ऊस दरावरून आंदोलनेही पेटली आहेत. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ही आंदोलने आक्रमक झाली असून काही कारखान्यांचे गाळपही यामुळे ठप्प झाले आहे.
आक्रमक शेतकऱ्यांनी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. कोल्हापुरात दत्त डालमिया साखर कारखान्याची, तर सोलापूर जिल्ह्यात सांगोला शेतकरी, पांडुरंग, युटोपीयन आणि सद्गुरु या कारखान्यांची वाहतूक आक्रमक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे.
कोल्हापुरात स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील दत्त डालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे.
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. ऊसाची वाहने अडवून आंदोलन सुरू केले. डालमिया कारखान्याने पहिली उचल ३०७५ जाहीर केली आहे.
गेल्या वर्षाच्या पेक्षा या वर्षी पहिली उचल कमी असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जोपर्यंत ३०७५ पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर होत नाही; तोपर्यंत कारखाना चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.