अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंध लागू आहेत. सोमवारी बाजारतळावर भाजी विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वांबोरी दूरक्षेत्र पोलिस पोहचताच धावपळ उडाली व काही मिनिटांतच बाजारतळ रिकामा झाला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, हेड काॅन्स्टेबल चंद्रकांत बऱ्हाटे, पोलिस नाईक सुशांत दिवटे, आदिनाथ पालवे, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर वांबोरीत कडक प्रतिबंध प्रशासनाच्यावतीने लागू करण्यात आले होते. सकाळी भाजी विक्रेते आल्याने गर्दी होते. सोमवारी बाजारतळ येथे मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते व खरेदीदार जमले होते.
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यापार्श्वभूमीवर वांबोरी दूरक्षेत्र पोलिस सुशांत दिवटे, नाईक बऱ्हाटे गर्दी कमी करण्यासाठी बाजारतळावर पोहोचले. त्यावेळी विक्रेत्यांसह खरेदीदारांचीही धावपळ उडाली. काही मिनिटातच बाजारतळ रिकामे झाले.
त्यानंतर पोलिसांनी बाजारपेठेत फेरी मारून दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. वांबोरीत कोरोनाची लाट काही अंशी ओसरतानाचे चित्र आहे.
महिनाभरापूर्वी दररोज २० ते ३० रूग्ण आढळून येत होते. परंतु, सोमवारी २४ तासात वांबोरीीत अवघे २ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता ही संख्या शुन्यावर आणण्यासाठी प्रशासनासह नागरिकांचीही जबबादारी वाढली आहे.