Ashok Gehlot : सध्या अनेक राज्यात राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये राजस्थान सरकारचा देखील अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मात्र हा अर्थसंकल्प सादर करताना येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत जुना अर्थसंकल्प वाचून दाखवला.
यामुळे एकच गोंधळ उडाला, अशोक गेहलोत जेव्हा बजेट वाचत होते, तेव्हा त्यांनी मागच्या वर्षीच्या योजनांचीही माहिती दिली. यामध्ये मागील वर्षी राबविण्यात आलेल्या नगरविकास योजनांचीही घोषणा त्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात चूक झाल्याचे सांगितले.
यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरू केला.
यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असे सांगितले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणाबाजी करणार्या विरोधी सदस्यांना शांत होऊन अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देण्याची विनंती केली.
असे असताना विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी चुकीबद्दल माफी मागावी, असे म्हटले आहे. हा लोकशाहीचा अपमान असल्याचे ते म्हणाले, हे राजस्थानचे दुर्दैव आहे, असे म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामुळे यामध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र याठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले.