अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना काळात श्रीगोंदे तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे.माझे काम सहन न झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.व प्रशासनाच्या या दबावाविरोधात मी उपोषण सुरू केले आहे.
अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही, असे बाळासाहेब नाहाटाने सांगितले. नाहाटाला न्यायालयात आणले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
श्रीगोंदे तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी झालेल्या हुज्जतीचे पर्यावसन वादात झाल्या कारणाने सोमवारी बाळासाहेब नाहाटावर श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा दाखल करण्यात तालुक्यातील राजकीय पुढाऱ्याचा हात आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी हे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे हाताचे बाहुले बनले आहेत.
राज्यातील मोठे नेते जर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणेसाठी दबाव आणत असतील तर हे निषेधार्ह आहे. त्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासल्यास कोण सूत्रधार आहे हे उघड होईल, असे नाहाटाने सांगितले.