अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- वृध्द महिलेला गंभीर दुखापत करून अंगावरील, घरातील सोन्याचे दागिणे चोरी करणारे आरोपी गजानन श्रावण शेंडेराव (रा. कुरूंदा ता. वसमत जि. हिंगोली), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव सखाराम भोकरे (रा. पारडी खुर्द, बहिरोबा चौंडी, ता. वसमत जि. हिंगोली) यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
तसेच या गुन्ह्यातील आरोपी सविता सखाराम भोकरे, बाळु उर्फ प्रदिप सखाराम भोकरे (दोघे रा. पारडी खुर्द, बहिरोबा चौंडी) यांना सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हा निकाल दिला. या खटल्यातील फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघे तिखोल (ता. पारनेर) येथे कायमस्वरूपी राहत असुन त्यांची मुले नोकरीनिमीत्त नगरला राहतात.
11 डिसेंबर 2016 रोजी फिर्यादी यांचे शेतात काम करण्यासाठी ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव भोकरे, बाळू उर्फ प्रदीप भोकरे व सविता भोकरे हे आले होते. त्यांनी 12 व 13 डिसेंबर 2016 या दोन्ही दिवशी फिर्यादीच्या शेतात व्यवस्थीत काम केले.
यानंतर गजानन शेंडेराव हा देखील कामावर आला. 14 डिसेंबर 2016 रोजी फिर्यादी हे त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी अहमदनगर येथे गेले होते. अहमदनगर येथून सायंकाळी सहा वाजता परत त्यांच्या तिखोल येथील घरी पोहचले. परंतु त्यांना त्यांच्या पत्नी व शेतात काम करण्यास आलेले मजुर दिसुन आले नाही.
म्हणुन त्यांनी आसपास पाहणी केली परंतु त्यांना कोणीच दिसले नाही. त्यानंतर ते त्यांच्या तुरीच्या शेतात गेले तेथे त्यांना त्यांची पत्नी तुरीच्या पीकाच्या ढिगाखाली जखमी बेशुध्दावस्थेत आढळुन आली.
तसचे तिच्या अंगावरील सोन्याचे दागिनेदेखील दिसुन आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी लगेच गावातील भाऊसाहेब ठाणगे यास फोन करून दुचाकी घेवुन शेतात बोलाविले व त्यांच्या जखमी पत्नीला शेतातुन रस्त्यावर आणले व त्यानंतर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केले.
फिर्यादीच्या पत्नीस तुरीच्या शेतामध्ये लोखंडी खोर्याने मारहाण करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याची व त्यांच्या घराचे कुलुप तोडुन घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याबाबत खात्री झाल्याने आरोपींविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. जाधव व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी केला. त्यानंतर तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटला हा सुरुवातीस जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सातभाई यांचेसमोर चालला त्यानंतर त्यांची प्रशासकिय कारणास्तव बदली झाल्याने सदर खटल्याची पुढील सुनावणी ही जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांसमोर पुर्ण झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष सरकारी वकील सौ. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी केलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सदर खटल्याच्या कामकाजादरम्यान विशेष सरकारी वकील यांना पोलीस अंमलदार पांडुरंग पाटील व बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.