विरोधी आमदार असल्याने राज्य सरकारकडून निधी मिळत नाही – आमदार राजळे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक जाणवत आहे. विरोधी आमदार असल्याने राज्य सरकारकडून निधी मिळत नाही. गेल्या दीड वर्षात कुठलाच निधी मिळाला नाही. सध्या ज्या कामांचे भूमिपूजन करीत आहोत ती मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत.

असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली व मोठा निधी दिला. दोन वर्षे होत आले तरी पालकमंत्र्यांनी अद्याप शासकीय समित्या केल्या नाहीत.

सध्या पाऊस लांबल्याने पालकमंत्र्यांना भेटून शेतीसाठी पाण्याचे रोटेशनची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले. पाथर्डी तालुक्यातील खर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, वसूजळगाव, सुसरे येथील पावणेपाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन गुुरुवारी झाले.

यावेळी त्या बोलत होत्या. तसेच नुकतेच ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजळे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राजळे यांनी उत्तर दिले. पाथर्डी तालुक्यातील अकोला गावातील नेतृत्व स्वत:च्या हिमतीवर व कर्तृत्वाने केंद्रीय पातळीवर गेले.

त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान व आदर कायम आहे. मात्र ज्यांना अद्याप सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करणे हा प्रकार हास्यास्पद आहे, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांना नाव न घेता लगावला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts