नवी दिल्ली : पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) पटेल यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी तोट्याचा ठरणार आहे.
याबाबत हार्दिकने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट (Tweet) करून ही माहिती दिली.
हार्दिक पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी (Gujrat) खरोखर सकारात्मक काम करू शकेन.
हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात (Letter) म्हटले आहे की, अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाचे काम देश आणि समाजहिताच्या विरुद्ध असल्याने काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘हे २१ वे शतक आहे आणि भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्व हवे आहे. गेल्या जवळपास ३ वर्षात मला असे दिसून आले आहे की काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे, तर देशातील जनतेला त्यांच्या भविष्याचा विचार करणारा, देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला पर्याय हवा आहे.
हार्दिक पटेल पुढे म्हणाले, ‘अयोध्येतील भगवान श्रीरामाचे मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा जीएसटी लागू करणे असो, देशाला यावर तोडगा हवा होता. आणि काँग्रेस पक्ष यात फक्त अडथळा म्हणून काम करत राहिला.
भारत असो, गुजरात असो किंवा माझा पटेल समाज असो; प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापुरती मर्यादित होती. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे कारण काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व जनतेसमोर मूलभूत रोडमॅपही मांडू शकले नाही.
आपल्या पत्रात हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, ‘काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये कोणत्याही मुद्द्याबाबत गांभीर्य नसणे ही मोठी समस्या आहे. मी जेव्हा-जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाला भेटलो तेव्हा गुजरातमधील जनतेच्या आणि पक्षाच्या समस्या ऐकण्यापेक्षा नेतृत्वाचा फोकस माझ्या मोबाईल आणि इतर गोष्टींकडे असल्याचे दिसून आले.
ज्या वेळी देश संकटात सापडला किंवा काँग्रेसला नेतृत्वाची सर्वाधिक गरज होती, तेव्हा आमचे नेते परदेशात होते. शीर्ष नेतृत्वाचे वर्तन गुजरातकडे आहे, जणू ते गुजरात आणि गुजरातींचा द्वेष करतात. मग गुजरातच्या जनतेने त्याला पर्याय म्हणून पाहावे अशी काँग्रेसची अपेक्षा कशी आहे?