ताज्या बातम्या

मोठी बातमी! बाजार समितीचा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो लाखमोलाचा; निर्णय छोटा मात्र, कौतुकास्पद….

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022  Market Committee Administration :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) उंबरठे नेहमीच झिजवावे लागतात.

खरं पाहता, बाजार समित्यांची उभारणी शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी केली गेली होती. शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षित पद्धतीने विक्री करता यावा यासाठी सरकारने याची सुरुवात केली होती.

मात्र, आता काळाच्या ओघात बाजार समित्यांचा उद्देश आणि नैतिकता संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीमध्येच शेतकऱ्यांची लुटमार (Looting of farmers) बघायला मिळत आहे विशेष म्हणजे बाजार समिती प्रशासनाचा (Market Committee Administration) यावर तिळमात्रही अंकुश नाही.

म्हणून नेहमी शेतकरी बांधव बाजार समित्यांचा अशा अनैतिक व्यवहारास छुपा पाठिंबा असतो असा आरोप करीत आले आहेत.

मात्र आता चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नवीन निर्णय घेतला आहे चाळीसगाव एपीएमसीच्या या निर्णयाने निश्चितच इतर बाजार समित्यांसाठी आदर्श घालून दिला आहे.

चाळीसगाव येथील एपीएमसीने नुकताच शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता चाळीसगाव एपीएमसीमध्ये भुईकाट्यावर लागणारा शुल्क माफ झाला आहे.

चाळीसगाव एपीएमसीच्या या निर्णयाची अंमलबजावणी दोन तारखेपासून अर्थातच मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होणार असल्याचे सांगितले गेले आहे.

चाळीसगाव एपीएमसी मधील हा सदर निर्णय प्रशासक दिनेश पाटील यांनी घेतला आहे कारण की 18 फेब्रुवारी पासून या बाजार समितीमध्ये अशासकीय प्रशासन कामकाज बघत आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला सदर निर्णय छोटा जरी असला तरी सुद्धा शेतकर्‍यांच्या हिताचा आहे. या एका निर्णयामुळे चाळीसगाव एपीएमसीचे वार्षिक सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न घटणार आहे मात्र एपीएमसीचा हा निर्णय शेतकरी बांधवांचे चांगले आशीर्वाद घेणारा आहे.

चाळीसगाव एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकरी बांधव दाखल होत असतात. शेतमालाची मोजणी तसेच वाहनांची मोजणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना भुईकाट्यावर कमीत कमी पन्नास रुपये मोजावे लागतात तर कित्येकदा यापेक्षाही अधिक पैसे खर्च करावे लागतात.

यामुळे चाळीसगाव एपीएमसीचा सदर निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हातभार लावणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. चाळीसगाव एपीएमसी चे प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय एपीएमसी मधल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने घेतला आहे.

एकंदरीत चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देशातील इतर बाजार समित्यांचे डोळे उघडवण्याचे काम केले आहे. शेतकरी बांधवांना आशा आहे की येत्या काही दिवसात इतर बाजार समित्या देखील चाळीसगाव एपीएमसीचे अनुकरण करण्यास सुरुवात करतील. जर असे झाले तर निश्चितच शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts