अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पहिल्या लाटेत पेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या लाटेत हा वेग अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
अडीच महिन्यात चार लाख रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे त्याचा सामना करण्यासाठी आपण दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत आरोग्य सेवा बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपल्याला ऑक्सिजन तुटवडा जाणवला. तिसऱ्या लाटेत तो जाणवू नये तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जिल्ह्यातच निर्माण व्हावा, यासाठी आपण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय परिसरात करीत आहोत.
यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सर्व यंत्रणांनी सुरू केली असली तरी अधिक गतीने काम करुन तो प्रकल्प लवकरात- लवकर उभारणी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले आहे .
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे दिसून येताच तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी देखील वर्तवली आहे. त्या अनुषंगाने उपाययोजना सुरु करण्यात येत आहे.