अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Weather news : गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयार झालेलं ढगाळ वातावरण आता निवळत असून उद्यापासून सूर्य पुन्हा तळपायला सुरवात होणार आहे.
३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले तापमान वाढत जाऊन ४३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तविला आहे. यावरून राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्रानं शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला दिला आहे.
पुढील दोन दिवस हवामान अंशत: ढगाळ राहणार असलं तरी तापमान वाढणार आहे. त्यामुळं मातीतील ओलावा वाचवण्यासाठी अच्छादनाचा वापर करावा, त्यासाठी गवताचे, पिकाचे अवशेष, पॉलिथीनचा उपयोग करावा. उन्हाळी भुईमुग सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.
पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी ४ मिली सायपरमेथ्रीन २५ ई.सी. किंवा २० मिली क्विनॉलफॉस २५ ई.सी. प्रती १० लीटर पाण्यातून फवारावे. ६० ते ७० दिवसानंतर शेंगा पोसण्याची अवस्था असल्यानं संरक्षित पाण्याची पाळी दयावी.
सर्यफुलावर केसाळ आळी दिसून आल्यास केसाळ अळ्यांच्या नियंत्रणासाठी एकत्रित खाणार्या लहान अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करावा.
किंवा १० किलो क्विनॉलफॉस १.५% किंवा कार्बारील १०% भुकटी प्रती एकर याप्रमाणात वारा शांत असताना धुरळावी. रब्बी काद्याचे पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आठवडे आधी पिकांचे पाणी तोडावे.
पिकावर बुरशी आढळून आल्यास बुरशीनाशकाचा (टेब्युकोनझोल ०.१%) फवारा द्यावा. मागील हंगामातील कपाशीची धस्कटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा, त्यामुळं त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.
एप्रिल मध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीत असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील.
वाढलेल्या उन्हाचा साठवून ठेवण्यासाठीच्या धान्यासाठी फायदा करून घेता येईल. या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्के पेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.