अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.
येत्या 11 ऑक्टोबरला बंद
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.
लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे.
सोमवारपासून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.पण उत्तर प्रदेश सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना तिथे जाऊ देत नाहीय
मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो !
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये ज्या कारने शेतकऱ्यांना चिरडले, ती कार आमचीच होती, अशी कबुली केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा एक पुरावा दाखवा, मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिका अजय मिश्रा यांनी घेतली आहे.
बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही.
मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी 11 ऑक्टोबरला बंद करणार आहोत.आज मंत्रिमंडळाने देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे. संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.