Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण कधी भरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. धरणामध्ये आधीचे ४५ टक्के पाणी शिल्लक असल्याने यावर्षी धरण भरण्याचे सर्व रेकॉर्ड तुटतील, अशी शक्यता होती;
मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेल्या पावसात अनियमता होती. अखेर काल भंडारदरा धरण ओसंडून वाहू लागले असून ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण १०० टक्के भरले आहे.
भंडारदरा धरण ८२ % झालेले असताना पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामुळे भंडारदरा धरण लवकर न भरण्याचे संकेत उपलब्ध झाले होते.
पाणी बंद झाल्यानंतर धरणाच्या पाणी पातळीने १० हजार ५०० दशलक्ष घनफुटाची पातळी ओलंडताच धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असे धरण शाखेकडून भरले असे घोषित होईल, अशी शक्यता होती. धरण शाखेकडुन धरणाचा पाणीसाठा १९ हजार ३९ दशलक्ष घनफूट झाल्यावरच धरण प्रर्ण क्षमतेने भरले असे गृहीत धरावे, असे सांगण्यात आले होते.
तर दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भंडारदरा धरण भरण्याची पुर्वपंरपंराही यंदा खंडीत झाली. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाची पाणीक्षमता ११ हजार ३९ झाली आणि धरण भरले. धरण भरल्याने आनंदाचे वातावरण पसरले असून आता निळवंडे धरण कधी भरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या २४ तासांत भंडारदरा येथे ३६ मीमी, घाटघर ४८, पांजरे ४०, रतनवाडी ६६ तर वाकी येथे १७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी लघुबंधाऱ्यावरुन कृष्णावंती नदीमध्ये ९८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.
भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहातून ८२० क्युसेकने पाणी प्रवरा नदीमध्ये वाहत आहे. पाऊस वाढला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रकाश चव्हाणं, सुरेश हंबीर, बरतड, मंगळा मधे, अंतु सगभोर, बाळु भांगरे, चंदर उघडे, शिंदे, रमेश सोनवणे यांच्यासह कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेठून आहे.