ताज्या बातम्या

अहमदनगर मनपाच्या या प्रभागात पोटनिवडणुकीची चाहूल

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे प्रभागा ९ मध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे.

या प्रभागासाठी प्रारूप मतदार याद्या १२ नोव्हेंबरला जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे. या प्रभागात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.

महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१८ मध्ये झाली होती, या निवडणुकीत प्रभाग ९ मधून श्रीपाद छिंदमने अपक्ष उमेदवारी करत विजय मिळवला होता.

परंतु, महापुरूषाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले होते. ठाकरे सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये छिंदमला हा दणका दिला होता.

छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे प्रभाग ९ (क) मध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार सात महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

त्यावर १६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल केल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

या यादी प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. १७ नोव्हेंबरला प्रभागाची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रांची यादी २२ नोव्हेंबरला प्रसिद्ध करून २३ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts